नवी दिल्ली | नवनीत राणा यांनी आज लोकसभेत आज निराधार पेन्शन योजनेवर भाष्य केले आहे. निराधार पेन्शन योजनेत केंद्र सरकार २०० रुपये तर राज्य सरकार ४०० रुपये मिसळून निराधार लोकांना ६०० रुपये देते आहे. मात्र आता महागाई अस्मानाला भिडली आहे. त्यामुळे ६०० रुपयांमध्ये गुजराण कशी होणार असा सवाल नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला केला आहे.
नवनीत राणा यांनी आज लोकसभेमध्ये निराधारांच्या पेन्शन योजनेवरून आक्रमक पवित्रा घेतला. चहापिण्यासाठी सुद्धा २० रुपये लागत मग ६०० रुपयात गुजराण कशी होणार असे नवनीत राणा यांनी म्हणले आहे.तर महाराष्ट्रातील घरकुल योजनेवर देखील राणा यांनी भाष्य केले आहे. महाराष्ट्राला केवळ ७ लाख घरकुल योजनेचं लक्ष्य देण्यात आलं आहे. पण, योजना ही २० ते २५ लाख घरकुलाची मंजूर करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली. तसेच, देशातील निराधारांना सरकारकडून मदत भत्ता म्हणून केवळ २०० रुपये देण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
निराधार, अंध-अपंग, बेरोजगारांना केंद्र सरकारने किमान २ हजार रुपये महिना भत्ता द्यावा, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली. पंतप्रधान हे देशाचे आहेत, ते कोण्या एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष द्यावे, असेही नवनीत यांनी म्हटले आहे.