फडणवीसांच्या होमपीच वर भाजपला हादरा; नागपुरात महाविकास आघाडीचा विजय

nagpur teacher election
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी भाजप पुरस्कृत ना. गो. गाणार यांचा दणदणीत पराभव केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या होम पीचवरच महाविकास आघाडीने विजय मिळवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजण्यापासूनच मतमोजणीला सुरुवात झाली.  काँग्रेसचे सुधाकर आडबाले आणि भाजपचे ना. गो. गाणार यांच्यात मुख्य लढत होती. यामध्ये आडबाले यांना आत्तापर्यंत १४०६९ हजारांहून अधिक मते मिळाली आहेत तर ना. गो. गाणार याना ६३६६ मते मिळाली आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आडबोले यांच्या विजयाचा दावा केला आहे. भाजपच्या मातृसंस्थेच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीचा भाजपला दणका. नागपूर शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे सुधाकर अडबोले विजयी असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे.

दरम्यान, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे. परंतु अमरावती, औरंगाबाद आणि नागपूर मतदारसंघात मात्र भाजपचे उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत. औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर आहेत तर अमरावतीत पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. एकूण निकाल पाहता महाविकास आघाडी भाजपपेक्षा वरचढ ठरली आहे