औरंगाबाद : कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त सर्वेक्षणाची जबाबदारी टाकण्यात येते. परंतु सर्वेक्षण करताना शिक्षकांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. शिक्षकांना कुठल्याही सुरक्षा सुविधा पुरवल्या जात नाहीत, म्हणून कोरोना सर्वेक्षणासाठी आधी सुरक्षा सुविधा द्या, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संघाने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे .
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. या संदर्भात शिक्षकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करणे, चौका-चौकात वाहन तपासणी करणे , स्वस्त धान्य दुकानावर पर्यवेक्षण करणे, कोविड सेंटरवर चौकशी अधिकारी अशा विविध कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु सदरील कामासाठी आवश्यक असणारे विमासुरक्षा कवच इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना शासनाकडून दिल्या गेले नाही.
सॅनिटायझर, मास्क, पीपीईकीट तसेच इतर आवश्यक साहित्य सुद्धा पुरविल्या जात नाही. गेल्या वर्षभरात सदरील कामावर कर्तव्य बजावताना अनेक शिक्षकांचा जीव गेला आहे. परंतु संबंधितांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळाला नाही .यामुळे अनेक कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारी दिली जाते.
शिक्षकही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून हे काम बिनबोभाट पार पडतात. परंतु या कामासाठी आधी सुरक्षा सुविधा आणि नंतरच कोरोना सर्वेक्षणाचे काम करू, अशी भूमिका प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संपर्कप्रमुख तथा जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य मधुकरराव वालतुरे, राजेश हिवाळे, काकासाहेब जगताप, कैलास गायकवाड, जे.के चव्हाण, बळीराम भूमरे, हारुन शेख, प्रशांत हिवर्डे, प्रवीण पांडे यांनी केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा