हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील शिवसेना- भाजप युती आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तोडली असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निशाणा साधला आहे. नवी दिल्ली येथे NDA खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. यावेळी बोलत असताना मोदींनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच, इथून पुढे ही आपल्याला NDA म्हणून काम करायचे आहे. भाजप काँग्रेससारखा अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही” असेही मोदी म्हणाले.
NDA खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकांसाठी पक्षाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. तसेच इथून पुढे काम कसे करायचे याबाबत देखील माहिती दिली. या बैठकीत नरेंद्र मोदींना विरोधी पक्षांवर देखील अप्रत्यक्षपणे टीका केली. नरेंद्र मोदी म्हणाले की, “शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती त्यावेळी सामना वृत्तपत्रात माझ्यवर टीका केली जायची. कारण नसताना वाद निर्माण होत असे. आम्ही अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर, “बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत.आपण एकत्र राहू, सर्वांचा आदर केला जाईल. भाजप काँग्रेससारखा अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेतून जाणार नाही” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्य म्हणजे, राजस्थानची निवडणूक जिंकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे नरेंद्र मोदींनी यावेळी म्हणले आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी बुधवारी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील NDA खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदार उपस्थित होते. सध्या भाजप वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या योजना आखत आहे. याचाच भाग म्हणून दिल्लीत NDA खासदारांची ही बैठक पार पडली आहे.