ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : महाराष्ट्रात करणार ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोनाच्या प्रमाणात चांगलीच वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण आणायचे असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवावा, अशी मागणी राज्यमंत्री मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत सर्व नेत्यांकडून करण्यात आली. या बैठकीत राज्यात कोरोना लसीकरण वाढविणे, रुग्ण संख्या कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतील आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान मोठा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मागवण्यात आला. त्यासाठी विशेष ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’चाही वापर करण्यात आला. राज्यात वाढती ऑक्सिजनची मागणी पाहता ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी राज्य शासनांत महाराष्ट्र ऑक्सिजन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत काल पार पडलेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याबाबत एकमत झाले. सध्या महाराष्ट्रात १८०० एवढी ऑक्सिजनची मागणी होत आहे. तर प्रत्यक्षात १३०० एवढ्या क्षमतेने राज्य सरकार ऑक्सिजनचे निर्मिती करीत आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये म्हणून शेजारील राज्यातून तसेच केंद्र सरकारकडे राज्याला ऑक्सिजनची मागणी करावी लागत आहे. ती करावी लागू नये म्हणून राज्यातच आता तब्बल तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला. ऑक्सीजन निर्मितीबरोबरच त्याच्या अनुषन्गाने महत्वाच्या असणाऱ्या घटकांवरही चर्चा करण्यात आली. तसेच क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्टवर उपाययोजना करणे ही सर्व कामं करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

You might also like