हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकशाही, संविधान व लोकसभेचा चौकीदार म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य म्हणजे हा चौकीदार चोर नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेल्या देशातील चोऱ्यांचा हिशेब सरकारला संसदेत द्यावा लागेल व मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत. यापुढे मोदी-शहांची अवस्था ‘सरकार नको, पण राहुल गांधींना आवरा’ अशीच होईल असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून राहुल गांधींचे अभिनंदन करताना सामनातून मोदींना टोले लगावले आहेत.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल ?
राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. फॅसिस्ट प्रवृत्तीच्या नरेंद्र मोदी यांच्यावर बहुमत गमावण्याची वेळ राहुल गांधींमुळेच आली. भारतीय राजकारणाचे खरे जननायक म्हणून ते पुढे आले. दोन ‘भारत जोडो’ यात्रांमुळे त्यांना संपूर्ण देशाचे पायी भ्रमण करून जनतेचे व देशाचे प्रश्न समजून घेता आले. 2024 ची निवडणूक हेराफेरी व हातचलाखी करून मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीने खिशात घातली, पण आता राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले असून पंतप्रधान मोदी यांची अवस्था कठीण होणार आहे. एकतर मोदी यांना स्क्रिप्ट व टेलिप्रॉम्पटरशिवाय धड बोलता येत नाही. प्रश्नापासून पळ काढण्याची त्यांची वृत्ती आहे. संसदेच्या सभागृहात त्यांचे बूड टिकत नाही. कारण गेली दहा वर्षे लोकसभेत विरोधी पक्षनेता असा नव्हताच. गुजरातची धर्मशाळा असल्याप्रमाणे मोदी-शहा हे लोकसभा चालवत होते. आता मोदी यांनी कितीही ठरवले तरी त्यांना लोकसभेतून पळता येणार नाही. लोकशाही, संविधान व लोकसभेचा चौकीदार म्हणून राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य म्हणजे हा चौकीदार चोर नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेल्या देशातील चोऱ्यांचा हिशेब सरकारला संसदेत द्यावा लागेल व मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत. यापुढे मोदी-शहांची अवस्था ‘सरकार नको, पण राहुल गांधींना आवरा’ अशीच होईल.
मोदी यांनी स्वतःचे बहुमत गमावले आहे. नायडू, नितीश, चिराग पासवान वगैरे लोकांच्या पाठिंब्यावर ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे मोदी-शहांच्या चोऱ्या, दरोडय़ांचा हिशेब त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांकडेही मागितला जाईल. निवडणुकांच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी यांच्या अनेक फसव्या योजनांवर प्रहार केले. अग्निवीर, जातीय जनगणना, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, भाजपच्या संविधानविरोधी कृतीवर प्रहार केले. निवडणुकीची दिशा व हवा बदलण्याचे काम या निवडणुकीत राहुल गांधी यांनी केले. मणिपूर जळत असताना मोदी यांनी पंतप्रधान म्हणून त्यांचे कर्तव्य बजावले नाही, पण राहुल गांधी हे बेडरपणे मणिपुरात गेले व लोकांना भेटले. या सगळय़ाचा परिणाम झाला व मोदी यांचा मुखवटाच गळून पडला. राहुल गांधी हे गांभीर्याने राजकारण करीत नाहीत, परिवारवादामुळे ते नेते आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला, पण ‘भारत जोडो’ यात्रेने एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मोदी यांच्या हुकूमशाहीचा आपण पराभव करू शकतो हा आत्मविश्वास त्यांनी लोकांत निर्माण केला व आता विरोधी पक्षनेतेपद स्वीकारून आपण गांभीर्यपूर्वक राजकारण करीत आहोत हे दाखवून दिले.
मोदी-शहांचे राजकारण हे भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या पैशांचे बुडबुडे आहेत. हे बुडबुडे फुटायला आता सुरुवात होईल. मोदी-शहांचा खोटारडेपणा व क्रौर्य यांचा समाचार घेण्याची ताकद राहुल गांधी यांच्या प्रामाणिकपणात आहे. सरकारच्या अनेक नेमणुकांसाठी एक पेंद्रीय समिती असते. त्यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो. निवडणूक आयोग, लोकपाल, सीव्हीसी, सीबीआय, ईडी प्रमुखपदी सध्या भाजपचे ‘घरगडी’ नेमले जातात. आता राहुल गांधी यांचे मत व आवाज तेथे असेल, विरोधी पक्षनेता हा देशातील जनतेचा खरा बुलंद आवाज आहे. सरकारच्या चुका दाखविण्याचे काम विरोधी पक्षनेता करतो व तीच टीका मार्गदर्शन म्हणून स्वीकारून पुढे जाणारा पंतप्रधान खरा लोकनायक बनतो. मोदी हे नेमके या परंपरेच्या उलट वागले, मोदी-शहांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीने लोकसभा वेठीस धरली व या कृतीस काही जणांनी चाणक्य नीतीची उपमा दिली. देशाची न्यायालये, मीडिया आज गुदमरलेले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे गुजरात ईस्ट इंडिया कंपनीच्या भाडोत्री मारेकऱ्यांच्या टोळय़ांप्रमाणे काम करीत आहेत.
देशभरात मांडलेला हा उच्छाद भयंकर आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना अशा प्रकारे देश चालवणे मान्य आहे काय? लोकसभेत आता टोकदार प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे. संसद सुरू असताना पंतप्रधान मोदी यांना विदेश पर्यटन करता येणार नाही. कारण त्यांचा कर्दनकाळ राहुल गांधी त्या वेळी संसदेत बसलेला असेल. राहुल गांधी यांनी मोदी यांना अनेक विषयांवर खुल्या मंचावरील चर्चेचे आव्हान दिले व मोदी यांनी पळ काढला. लोकसभेच्या मंचावर आता ही चर्चा घडेल व जग टाळया वाजवील, राहुल गांधी यांना शिष्टाचाराचे ‘राम राम’ करूनच पंतप्रधान मोदी यांना आसनस्थ व्हावे लागेल. संसदेत ‘मोदी मोदी’चे फालतू नारेही बंद होतील. देशाची हवा बदलली आहे. लोकशाहीचा नवा चौकीदार लोकसभेत रुजू झाला आहे. राहुल गांधी यांचे अभिनंदन