हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत, त्यांना माफीवीर वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कोणाला मिळणार नाही असं म्हणत सामना अग्रलेखातून काँग्रेस नेते राहुल गांधी याना कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वांत जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही असेही सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल आहे?
राहुल गांधी वारंवार बोलत आहेत की, मी घाबरत नाही. मला तुरुंगात डांबले तरी प्रश्न विचारत राहीन. श्री. राहुल गांधी है घाबरत नाहीत व अदानी-मोदी संबंधावर वारंवार प्रश्न विचारीत आहेत हे खरेच, पण राहुल गांधी यांनी स्वतःबरोबरच त्यांच्या संपूर्ण पक्षाला व देशालाही निर्भय बनविण्याची गरज आहे. “माझे आडनाव सावरकर नाही”, अशी विधाने वारंवार करून ही निर्भयता निर्माण होणार नाही व वीर सावरकर यांच्या बाबतीत जनतेच्या मनात असलेल्या श्रद्धेलाही तडा जाणार नाही. वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही, ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे. अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे. वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्धयांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळया चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील. असं सामनातून म्हंटल आहे.
उद्धव ठाकरेंनी 'या' कारणामुळे राजीनामा दिला; शिंदे गटाने फोडला नवा बॉम्ब
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/MKFsCRxfRS#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 27, 2023
मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत. त्या सत्याचा विजय होणार नाही. राहुल गांधी हे शहीदांच्याच कुटुंबात जन्मास आले व ते खरेच आहे. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य लढयाच वडिलोपार्जित सर्वस्व पणास लावले. त्यांनी त्यांचा काळा पैसा एखाद्या अदानीत मुतवून व्यापार केला नाही. त्यांचे जीवन देशासाठीच होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान केले व त्या बलिदानाची जाणीव देशाला सदैव राहील. पण वीर सावरकर, त्यांचे वधू बाबाराव सावरकर व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने राष्ट्रासाठी तितकाच महान त्याग केला.
सावरकर हे जगातील असे पहिले लेखक होते ज्यांच्या ‘1857 चा स्वातंत्र्यसंग्राम’ या पुस्तकावर दोन देशांनी प्रकाशनापूर्वीच बंदी घातली होती. इंग्लंडच्या राजाप्रति निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार देणारे पहिले हिंदुस्थानी विद्यार्थी होते वीर सावरकर राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन करतानाच बंदिवासातील जीवन संपल्यावर अस्पृश्यता आणि इतर कुप्रथाविरुद्ध आंदोलन करणारे कर्ते समाजसुधारक म्हणून सावरकरांनी दिलेले योगदानही विलक्षण आहे. सावरकर हे जगातील असे एकमेव कवी आहेत, ज्यांनी अंदमानच्या काळकोठडीत भिंतीवर खिळे व कोळशाने कविता लिहून त्या पाठ केल्या आणि कारागृहातून सुटल्यावर पाठ केलेल्या कवितांच्या 10 हजार ओळी पुन्हा लिहून काढल्या विदेशी वस्त्राची होळी करणारे. हिंदुस्थानचे आद्य राजकारणी म्हणूनही नाव पुढे येते ते सावरकरचिच, वीर सावरकरांची थोरवी सांगायची तरी किती? पण विद्यमान राजकारणात सावरकरधि नाव ओढून त्यांना खुजे ठरवण्याचा प्रयत्न कलेशदायक आहे.
राहुल गांधी वीर सावरकराविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वांत जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या गावागावांत वीर सावरकर अनेक स्वरूपात उभे आहेत व ते ताठ कण्याने उभे आहेत, असं म्हणत सामना अग्रलेखातून राहुल गांधी यांच्यावर नेम साधण्यात आला आहे.