बजरंगबलीने मोदी- शहांच्याच टाळक्यात गदा हाणली; सामनातून हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारात बजरंगबलीस उतरवले व मतदानाच्या दिवशी हनुमान चाळीसा सारखे कार्यक्रम करायला लावले, परंतु या सगळय़ाचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी- शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला. तसेच सामान्य माणूस हुकूमशाहीचा पराभव करू शकतो हे कर्नाटकच्या निकालाने स्पष्ट केले असेही सामनातून म्हणत आहे.

कर्नाटकचा निकाल मोदी-शहांच्या विरोधात गेला. कानडी जनतेने मोदी-शहांच्या भाजपचा मोठा पराभव केला. हा देशासाठी शुभशकुन आहे व त्यासाठी कानडी जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. काँग्रेस पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आणि जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप 65 या आकडय़ावरच लटकला. कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारून भाजपकडून दक्षिणेतले एकमेव राज्य हिसकावून घेतले. देशात 2024 साली काय घडेल याचे दिशादर्शन कानडी जनतेने केले आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव ठरलेलाच होता. मोदी-शहांनी कितीही उसने अवसान आणून ‘जितंमय्या’चा आव आणला तरी त्यांची हवा कर्नाटकच्या जनतेने काढून घेतली. काँग्रेस कर्नाटकात एकसंध होती. नेत्यांत मतभेद असले तरी त्यांनी ते निवडणुकीच्या दरम्यान उघड केले नाहीत. मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा ज्यांना होती असे डी. शिवकुमार, सिद्धरामय्या यांनी ‘हायकमांड’ वर सर्वकाही सोपवून प्रचारात झोकून दिले.

मुळात कर्नाटकातले भाजपचे बोम्मई सरकार भ्रष्टाचार व लुटमारीच्या प्रकरणात पूर्ण बदनाम झाले होते. शिवाय महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे होते व त्यावर न बोलता भाजपवाले व त्यांचे दिल्लीचे नेते हिंदू-मुसलमानांत तेढ या सगळय़ाचा काहीएक परिणाम कर्नाटकात झाला नाही. उलट बजरंगबलीने गरागरा गदा फिरवून ती मोदी- शहांच्याच टाळक्यात हाणली व विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली हे स्पष्ट आहे. भाजपचे नकली हिंदुत्व कर्नाटकात अजिबात चालले नाही. मोदी यांच्या नेहमीच्या रडगाण्यास भीक घातली नाही. काँग्रेसने मला आतापर्यंत 91 वेळा शिव्या दिल्या, असे अश्रू पंतप्रधान मोदी प्रचार सभांतून ढाळत होते. या रडक्या पंतप्रधानांची प्रियंका गांधी यांनी खिल्ली उडवली. लोकांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत, पण मला शिव्या घातल्या म्हणून रडत आहेत, हा प्रचार प्रियंका गांधींनी केला. काँग्रेसने भाजपच्या धोरणांवर, महागाईवर, गॅस सिलिंडरच्या भाववाढीवर भर दिला. कर्नाटकात महिलांनी काँग्रेसला मतदान केले याचे कारण महागाई व प्रियंका- राहुल गांधींचा प्रचार. लोकांना बजरंगबली, हिजाबपेक्षा त्यांचे जीवनावश्यक मुद्दे महत्त्वाचे वाटतात.

मोदी व शहांच्या धार्मिक मुद्दयांना महत्त्व न देता कर्नाटकने देशाच्या व राज्याच्या प्रश्नांना महत्त्व देऊन निकाल हे महत्त्वाचे. ‘कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर दंगली होतील,’ असा इशारा प्रचारादरम्यान गृहमंत्री अमित शहांनी दिला होता. ही खरे तर धमकीच होती. मात्र त्या धमकीला भीक न घालता कर्नाटकने भाजपचा पराभव केला व भाजपचा पराभव होऊनही कर्नाटक शांत आहे. सामान्य माणूस हुकूमशाहीचा पराभव करू शकतो हे कर्नाटकच्या निकालाने स्पष्ट केले. असं म्हणत सामनातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.