हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तीर्थक्षेत्र आळंदी येथे पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्यानंतर विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा आध्यात्मिक आघाडीचा भोंदू आचार्य तुषार भोसले हा डुप्लिकेट वारकरी आहे, या सर्व प्रकरणाला तुषार भोसले हाच जबाबदार असून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असं सामनातून म्हंटल आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी चूकीच्या लोकांचे समर्थन करू नये असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?
वारकऱ्यांवर आळंदीत निर्घृण असा लाठीमार झाला आहे. आळंदीतून ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचे प्रस्थान होणार होते. हजारो वारकरी त्यासाठी गळय़ात तुळशीमाळा घालून, कपाळास अबीरबुक्का लावून, खांद्यावर पताकांचे भार घेऊन जमले. तोंडाने ‘ग्यानबा तुकाराम’, ‘रामकृष्ण हरी’ हा नाममंत्र जपत ते दंग झाले असतानाच त्यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. तुकोबाच्या मंदिरात भारतीय जनता पक्षाने राजकीय बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला व त्यातून वारकऱ्यांना लाठीमाराचा खावा लागला. तीर्थक्षेत्र आळंदी येथे नेमके काय घडले ते वारकऱ्यांकडून त्यांच्याच शब्दांत समजून घेतले पाहिजे. वारकरी सांगतात, “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होता. हा संपूर्ण सोहळा राजकीय स्वार्थासाठी हायजॅक करण्यात आला. भाजपचा आध्यात्मिक आघाडीचा भोंदू आचार्य तुषार भोसले व मिंधे गटाचा अक्षय शिंदे या लोकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळय़ात हस्तक्षेप सुरू केला. मानाच्या दिंडय़ा व फडकरी यांना अपमानास्पद वागणूक दिली. मर्जीतल्याच लोकांना प्रवेश दिला. यावरून वादावादीस सुरुवात झाली. वारकऱ्यांच्या भावना समजून न घेता डुप्लिकेट वारकरी तुषार भोसले याने चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अरेरावी सुरू केली. त्यातून रेटारेटी झाली व वारकऱ्यांना पोलिसांनी बदडले.” या सर्व प्रकरणास डुप्लिकेट वारकरी तुषार भोसले हाच जबाबदार आहे.
याच भोसलेने आधी त्र्यंबकेश्वरात जाऊन तेथील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न व आता आळंदीत वारकऱ्यांशी अरेरावी करू लागला. महाराष्ट्राच्या इतिहासात वारकरी संप्रदायावर पालखी सोहळय़ात असा लाठीमार झाला नव्हता. हिंदुत्वाच्या नावाने छाती पिटणाऱ्या व गळे फोडणाऱ्या मिंधे – फडणवीसांच्या राजवटीत हे घडले आहे. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. महाराष्ट्राला वारीची 300 वर्षांची परंपरा आहे. 300 वर्षांत कधीही न झालेली गोष्ट फडणवीस-शिंदे यांनी करून दाखवली. सरकारचे म्हणणे आहे, लाठीमार झालाच नाही. सरकारच्या बुबुळांच्या गारगोटया झाल्या आहेत. त्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. वारकऱ्यांवरील मारहाणीचे, लाठीमाराचे ‘व्हिडीओ’ समोर आले तरीही गृहमंत्री फडणवीस म्हणतात, असे काही झालेच नाही. काय म्हणावे या खोटेपणास ? भाजपच्या तथाकथित आध्यात्मिक आघाडीचा तुषार भोसले हा वारकऱ्यांवर दबाव आणून भाजपास हवे ते करून घेण्याच्या प्रयत्नात होता व त्याच्यामुळेच आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसी हल्ला झाला त्यामुळे या तुषार भोसलेवर गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे असं सामनातून म्हंटल आहे.
मंदिरात ठरावीकच संख्येने प्रवेश देण्यावरून वारकरी व प्रशासनात वाद झाला असेल तर वारकरी संप्रदायास विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात सरकार कमी पडले. येथे राजकीय घुसखोरीचा प्रयत्न झाला व आळंदीतील शांततेला तडा गेला. गेल्या कित्येक वर्षांची परंपरा अशी की, वारी शिस्तीत व शांततेत पुढे जात असते. पोलीसही वारकरी म्हणूनच वारीत सहभागी होतात, हातात टाळ घेऊन श्रीहरीचे नामस्मरण करतात, फुगडय़ा घालतात. हे चित्र आम्ही वर्षानुवर्षे पाहत आहोत. त्या परंपरेस आताच गालबोट लागले. श्री. फडणवीस म्हणतात ते वेगळे व प्रत्यक्ष चित्र वेगळे. फडणवीस यांनी चुकीच्या लोकांचे समर्थन करण्याचे सोडले पाहिजे असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे.