हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी बोलताना, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये बोलताना, “छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कधीच होऊ शकत नाही. त्रिवार नाही” असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर, राम मंदिर सोहळ्यात कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. अजिबात नाही, त्रिवार नाही, शिवरायांशी तुलना कदापि शक्य नाही. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज राम मंदिर उभे राहिले नसते. नरेंद्र मोदी इतक्या वर्षात अयोध्येला गेले नव्हते, जगभर फिरले, लक्षद्वीपला गेले, पण मणिपूरला गेले नाहीत, अयोध्येत गेले नाहीत” अशा ठिकाणी ठाकरेंनी मोदींवर केली.
तसेच, “आपला इतिहास आहे, जो महाराष्ट्रावर आला, त्याला महाराष्ट्राने मूठमाती दिली. मग तो अफझलखान असो किंवा औरंगजेब. प्रभू रामचंद्र ही कोणा एका पक्षाची प्रॉपर्टी नाही. नाहीतर आम्हालाही भाजपमुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. जय श्रीराम ऐवजी भाजपमुक्त जय श्रीराम म्हणावे लागेल. राम की बात झाली, काम की बात करा, काँग्रेस सोडा, गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केले?”असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आयोध्यातील सोहळ्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत गोविंद महाराज म्हणाले होते, “तप करणे ही भारताची परंपरा राहिली आहे. आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय” अशा शब्दांमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. यावरून विरोधक भाजप आणि गोविंद महाराज यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.