हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी २ आरोपीना याप्रकरणी अटक केली. सदर आरोपींची चौकशी केली असता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ओवेसींची हत्या करून आरोपीना हिंदू नेता बनायचे होते अशी कबुली दोन्ही आरोपींनी दिली. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.
ओवेसी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सचिन आणि शुभम या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. ओवेसी यांना जीवे मारण्यासाठीच हा हल्ला केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. ओवेसी यांची हत्या करून प्रसिध्द व्हायचे आणि हिंदूत्ववादी नेता बनायचं अशी आरोपींची इच्छा होती. दोघांनीही गुन्हा कबूल केला आहे.
अनेक दिवसांपासून सचिन आणि शुभम यांची ओवेसींवर हल्ला करण्याची योजना करत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते ओवेसींची हालचालींवर सतत लक्ष ठेवून होते. त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी मिळावी यासाठी सचिन आणि शुभम यांनी ओवेसींच्या अनेक सभांनाही हजेरी लावली होती. मात्र गर्दीमुळे त्यांना हल्ला करता आला नाही. ओवेसी मेरठहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि ते ओवेसींच्या आधी टोलगेटवर पोहोचले. त्यांची गाडी येताच दोघांनीही त्यांच्या कारवर गोळीबार केला, असंही पोलीस चौकशीत स्पष्ट झालं आहे
कधी झाला होता हल्ला –
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हे पक्षाच्या प्रचारासाठी आले असता त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. ३ फेब्रुवारीला त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात ओवेसी यांना कोणतीही इजा झालेली नव्हती .