औरंगाबाद – चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंगणवाडी मदतनीसचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना पैठण तालुक्यातील आखातवाडा शिवारात घडली आहे. सदर महिलेचा मृतदेह उसाच्या फडात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटना अनैतिक संबंधातून घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, याप्रकरणी वडवाळी गावातील एका तरुण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवाळी गावातील गंगुबाई विठ्ठल कोरडे (38) अंगणवाडी मदतनीस शनिवारी दुपारच्या सुमारास कापूस वेचण्यासाठी आखातवाडा शिवारातील बटाईने घेतलेल्या शेतात गेली होती. अंधार पडल्यानंतरही ती घरी परत न आल्याने कुटुंबाने तिचा रात्रभर शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही ठावठिकाणा लागत नसल्याने महिलेच्या मुलाने अखेर रविवारी पैठण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गंगुबाई ही वडवाळीच्या अंगणवाडी शाळेत मदतनीस म्हणून कामाला होती. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास आखातवाडा शिवारातील शेतात तिचा मृतदेह आढळून आला. गंगुबाई यांच्या गळ्याभोवती व्रण आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक श्रीमती जनाबाई सांगळे, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.
गुन्हा दाखल होताच आरोपीने केले विष प्राशन –
मृत महिलेच्या मुलगा परमेश्वर विठ्ठल कोरडे याने महादेव विनायक मैंदड यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हा दाखल होताच महादेव मंडळ त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याच्यावर पैठणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.