सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीतल्या नगरभूमापन कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. वारसाची नोंद करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एका एजंटला रंगेहात पकडण्यात आले. या कार्यालयात तक्रारदार यांच्या वारसाची नोंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच द्यावी लागते, असे सांगून तडजोडी अंती 3 हजार रुपये घेताना पकडले. प्रमोद काशिनाथ शिंदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लाच लुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. तक्रारदार हे सांगली मध्ये राहतात. त्यांच्या वडिलांच्या जागेवर वारसा नोंद करण्यासाठी ते नागरभूमापन कार्यालयात गेले होते. याठिकाणी वारस नोंदीचे काम करून देण्यासाठी खाजगी एजंट प्रमोद शिंदे यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
नगर भूमापन कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याला हे पैसे द्यावे लागतात, असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. याबाबत संबंधितांनी 31 मार्च रोजी सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिंदे याच्याबाबत तक्रार केली होती. यानंतर आज सांगली येथील गणेश नाष्टा सेंटर या ठिकाणी सापळा लावला असता प्रमोद शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करत तीन हजार रुपये स्विकारल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदे याला रंगेहाथ पकडले.