औरंगाबाद – तब्बल दीड वर्षांनंतर आजपासून औरंगाबाद मनपा क्षेत्रातील महापालिकेच्या व खासगी शाळा सोमवार (ता.चार ) पासून सुरू होणार आहेत. आठवीपर्यंत असणाऱ्या 393 तर आठवी ते बारावीपर्यंत असणाऱ्या 413 शाळा सुरू होणार आहेत. अशा 806 शाळा सुरू होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांतही आनंदाचे वातावरण असून, बच्चे कंपनीमुळे ओसाड भासणाऱ्या शाळा पुन्हा गजबजणार आहेत.
राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियमांच्या तरतूदीनुसार नियमावली प्रसिध्द करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने लावण्यात आलेले निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे आता सोमवार ( ता. चार ) पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीतील 8 वी ते 12 वी पर्यतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत.
त्यानुसार महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या उपस्थितीत शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात आली. शहरातील खासगी माध्यमिक विभागाच्या तसेच पालिकेच्या अशा एकूण 413 शाळा शहरात सुरू होत आहे. यात पालिकेच्या 17 शाळांचा समावेश आहे. या 413 शाळांमध्ये 78 हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. तसेच 3 हजार 500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.