प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईनेच नऊ वर्षीय मुलाचा घोटला गळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ‘स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी’ असे म्हटले जाते. आईची माया शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. परंतु, वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे चक्क आईनेच आपल्या नऊवर्षीय काळजाच्या तुकड्याची प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आश्चर्य म्हणजे आठ दिवसांपूर्वी मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करून तिने पोलिसांत तक्रार दिली होती. सार्थक रमेश बागूल (वय नऊ, रा. भिंगी रोड खंडाळा, ता. वैजापूर) असे मृताचे तर संगीता रमेश बागूल (वय 34, रा. खंडाळा) आणि साहेबराव पवार (वय 56, रा. सावतावाडी खंडाळा) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, सार्थकचे अपहरण झाल्याची वैजापूर पोलिसांत 11 फेब्रुवारीला संगीता व साहेबराव यांनी तक्रार दिली होती. दरम्यान, शुक्रवारी तलवाडा शिवारात कुजलेल्या अवस्थेत एक मुलाचा मृतदेह सापडल्याने शिऊर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र, मृतदेह पूर्णपणे फुगल्याने व उग्र वास सुटल्याने पोलिसांनी घटनास्थळी लोणी खुर्द आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना बोलावून जागेवर शवविच्छेदन केले. नंतर दफनविधी करण्यात आला. दरम्यान, रात्री घटनास्थळावर मुलाचे काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या मुलाची ओळख पटली.

शुक्रवारी उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती, तहसीलदार राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी तलवाडा शिवारात जेसीबीने पुन्हा खड्डा करून सार्थकला ज्या ठिकाणी पुरण्यात आले होते त्या ठिकाणी मृतदेह बाहेर काढून आई, वडिलांकडून ओळख परेड घेतली. त्यावेळी हा सार्थक असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना पहिल्या दिवसांपासून सार्थकची आई आणि तिच्या प्रियकरावर संशय होता. त्यामुळे संगीताला ताब्यात घेऊन खाकी हिसका दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. साहेबराव यांनी सार्थकला दुचाकीवर बसवून तलवाडा शिवारात आणले व गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले.

ही घटना उघडकीस आल्यानंतर संगीताचा प्रियकर साहेबराव याने विष घेतले. त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. संगीताला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या मुलाच्या आईवर आणि प्रियकरावर वैजापूर पोलिस ठाण्यात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment