सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे बुधवारपासून बेपत्ता झाले होते. शिंदेवाडी येथील एका हाॅटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शशिकांत घोरपडे हे सारोळा येथील नदीकडे जाताना कैद झाले होते. त्यानंतर त्यांच्या मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनवरून ते नीरा नदीपुलावरून बेपत्ता झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यानुसार पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स व एनडीआरएफच्या टीमने आज सकाळी नीरा नदीपात्रात त्यांचा शोध सुरू केला. यावेळी एनडीआरएफच्या टीमला शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह आढळून आला आहे. पण, अद्याप आत्महत्येचे गुढ अद्यापही उकललेले नाही.
शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी साडेतीन वाजता पुणे येथील कार्यालयातून बाहेर निघाले. त्यानंतर ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांची कार सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास टोलनाका पास करून सातारा बाजूकडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचे लोकेशन मिळाले होते. त्यावेळी शेवटचे लोकेशन सारोळा नीरा नदीपुलाचे लोकेशन होते. घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची कार (क्र. एमएच- 11 सीडब्ल्यू- 4244) ही पुलानजीकच्या हॉटेलसमोर आढळून आली. त्यानुसार घोरपडे यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची फिर्याद नोंदवली होती.
नीरा नदीपात्रात एनडीआरफच्या 2 बोट आणि महाबळेश्वर ट्रेकर्स यांची 1 बोट अशा एकूण 3 बोटच्या माध्यमातून शोधकार्य सुरू होते. नदीची खोली 70 फूट असल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत होते. बेपत्ता पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात आढळून आला. त्यामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असून त्याचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजलेले नाही.