औरंगाबाद – गेल्या काही वर्षांपासून प्रियकरासोबत राहणाऱ्या एका महिलेला शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो, असे सांगत तब्बल 22 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. पैसे घेतल्यानंतर प्रियकर गायब असून प्रेयसीने आता उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. पोलीस या प्रकरणी ज्ञानेश माणिकराव कांदे (परळी,बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, 13 वर्षाच्या मुलासोबत ही महिला एकटी राहून आपला उदरनिर्वाह चालवते. पतीच्या निधनानंतर तिने खानावळ सुरु केली होती. त्यावेळी ज्ञानेशने तिच्याकडे मेस लावलेली होती. ज्ञानेशसोबत ओळख, मैत्री आणि प्रेम झाले. त्यानंतर दोघांनीही एकत्र रहायला सुरुवात केली. 2014 मध्ये प्रेयसीने एक प्लॉट विकत घेतला. त्यावेळी ज्ञानेश शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्याने महिलेलाही जास्त नफा मिळवू असे म्हणत सदर प्लॉट विकायला भाग पाडले. महिलेने 17 लाख 75 हजारात प्लॉट विकला. तसेच 4 लाखांची एफडी मोडायला लावली. असा प्रकारे त्याने 22 लाख रुपये घेतले.
प्रेयसीकडून घेतलेले 22 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे ज्ञानेशने तिला सांगितले. काही दिवसांनंतर पैशांची विचारणा केली असता, आपण काही दिवसांत एकत्रच पैसे काढू असे त्याने सांगितले. मात्र त्यानंतन त्याने टाळाटाळ सुरु केली. त्यांच्यात वाद झाला. ज्ञानेश घरातून निघून गेला. तिने अनेक दिवस वाट पाहिली, मोबाइलवर पैशांची मागणी केली. पैसे देतो, असे म्हणून त्याने बाँडवर लिहून दिले. पण रक्कम काही परत केलेली नाही. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.