मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सलग 10 दिवस किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. दरम्यान या बैठकीमध्ये कडक लॉकडाउन लागण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडवू
यावेळी ‘आपण जनतेला समजू शकतो पण कोरोनाला समजाऊ शकत नाही’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बैठकीच्या शेवटी आपला निर्णय काय?कडक लॉकडाऊन पण जनतेचा उद्रेक यामध्ये मार्ग काढावा लागेल थोडावेळ सर्वांना कळ सोसावी लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी ज्या सर्वांशी चर्चा केली त्यांनी सर्वांनी सहकार्य केले. तसेच व्यापारी उद्योजक यांना काही अवधी लागेल एक दोन दिवसात व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडवू. नाही तर सर्व काही सुरू ठेवा आणि जे काही अनर्थ ओढावेल त्याला सामोरं जावं लागेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
किमान 15 दिवसांचा लॉक डाउन गरजेचा
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले जेवढे लवकर आपण कोरोनाला थोपवू तेवढं आपण संक्रमण रोखू शकतो. माझं मत आहे की किमान पंधरा दिवस लॉकडाऊन करावा. तुम्ही तुमचं मत सांगा…माझं हे म्हणणं नाही की महिना दोन महिना लॉक डाऊन करा. पण हळूहळू एक एक घटक सुरू करू शकतो. पण सुरुवात तर करू?असा जनतेला प्रश्न करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किमान पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लावावा लागेल असं सांगितलं.
आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही व्यक्तींमध्ये कोवीडची लक्षणे दिसत आहेत. यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहे. कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची आहे. आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे आहे.पण आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. मध्यंतरी बराच काळ होता सर्व व्यवहार सुरू झाले होते. पण पुन्हा एकदा संसर्ग सुरू झालाय आता तरुण वर्ग बाधित आढळतो आपण सर्वांना लस देण्याची मागणी करत आहोत.
आम्ही सहकार्य करू : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री आपण अंतिम निर्णय घ्यावा आम्ही सहकार्य करू पुढील 15 दिवस अनेक सुट्ट्या आहेत. त्यामुळेच निर्णय घ्यावाच लागेल.