आधी डोक्यात घातला दगड, मग जाळले गुप्तांग; तरुणाच्या अमानूष हत्येने हादरले शहर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरात खुनांचे सत्र सुरूच असून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिसारवाडी भागातील खुनाची घटना ताजी असतानाच ही एक खुनाची घटना उघडकीस आल्याने पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

शहरातील टी व्ही सेंटर चौकातील ग्राउंडवर तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक तरुणाचे नाव सिद्धार्थ साळवे असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे वय सुमारे 32 वर्षे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून त्याचे गुप्तांगही आरोपींनी जाळले आहे. आरोपी एक पेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाची ओळख पटली आहे. या तरुणाची हत्या होऊन 24 तासांपेक्षाही अधिक काळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच दारू पिण्यावरुन वाद झाल्यानंतर ही हत्या केली असावी असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. मृतक तरुणाचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.