औरंगाबाद – कंपनीच्या गेटवर मोबाईल चार्जिंगला लावणे वाळूज उद्योग नगरीतील एका सुरक्षारक्षकाला चांगलेच महागात पडले. गस्तीवर गेलेल्या सुरक्षारक्षकांच्या मोबाईल ‘फोन पे’वरून स्वत:च्या खात्यावर 99 हजार रुपये जमा करून गंडा घालणाऱ्या माजी सहकारी सुरक्षारक्षकाविरुद्ध अडीच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्तात्रय शहाणे हे वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. आधी ते सुरक्षारक्षक शुभम शंकरराव इंगोले (रा. भाटेगाव, ता. हदगाव, जि. नांदेड) याच्यासोबत सिडलर कंपनीत कामाला होते. तेथे इंगोलेने त्यांच्या ‘फोन पे’चा पासवर्ड बघितला होता. 18 ऑक्टोबरला रात्री सिडलर कंपनीत शहाणे व इंगोले हे दोघे कामावर होते.
मध्यरात्री शहाणे कंपनीच्या गेटवर आपला मोबाईल चार्जिंगला लावून गस्त घालत होते. इंगोलेने शहाणे यांचा मोबाईल घेऊन सुरुवातीला 50 हजार रु. स्वत:च्या खात्यावर जमा केले. यानंतर काही वेळातच पुन्हा 99 हजार रुपये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे ट्रान्सफर न झाल्याने पुन्हा 49 हजार रुपये जमा करून घेतले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर शहाणे यांनी इंगोलेचा शोध घेतला असता, तो पसार झाल्याचे आढळले. अनेक दिवस त्याचा शोध घेऊन व वाट पाहून शहाणे यांनी अडीच महिन्यांनी एमआयडीसी वाळूज ठाणे गाठून तक्रार दिली. तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.