औरंगाबादेत अवकाळी पावसाची हजेरी; तर मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात गारपीटीचा फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून सूर्यदर्शनच न लाभलेल्या औरंगाबाद शहरात आज दुपारी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. शहरासह ग्रामीण भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली. औरंगाबादसह जालना, बीड, परभणी, हिंगोली आदी मराठवाड्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. संक्रांतीच्या वानवश्यासाठी बाहेर निघालेल्या महिला वर्गाला मात्र या पावसामुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला.

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, ज्वारीसह उसाचे पीक आडवे झाले आहे. तसेच फळबागा आणि भाजीपाला पिकांनाही जबरदस्त फटका बसला आहे. अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि देगलूर तालुक्यात प्रचंड नुकसान झालंय. रब्बी हंगामातील गव्हू, ज्वारी आणि हरभरा वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने थेट आडवाच पडलाय. तर तोडणीला आलेल्या उसाच्या पिकालाही वादळी वाऱ्याने जमिनीवर लोळवलय. टरबूजसारख्या फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांचेही जबरदस्त नुकसान या अवकाळी पावसाने केलय. त्यामुळे बळीराजा प्रचंड हतबल झाला असून सरकारकडे मदतीची याचना केल्या जात आहे. आज नुकसान झालेल्या भागाची महसूल तथा कृषी विभागाने पाहणी केलीय मात्र शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर पुढील चार दिवस किमान तापमानात हळू हळू दोन ते तीन अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 जानेवारीप्रमाणेच 15 जानेवारी रोजी देखील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ही माहिती परभणी येथील वसंतराव नाइक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाने दिली आहे.

Leave a Comment