हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राजकीय वर्तुळात भारत आणि इंडिया या नावावरून वाद निर्माण झालेला दिसत आहे. या वादाचे पडसाद आता भारतीय कंपन्यांवर देखील उमटू लागले आहेत. भारत आणि इंडिया नावावर वाद सुरू झाल्यानंतर लॉजिस्टिक कंपनी ब्लू डार्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कंपनीने आपल्या प्रीमियम सेवेचे डार्ट प्लस नाव बदलून भारत डार्ट असे केले आहे. याबाबतची माहिती ब्लू डार्टने एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील नागरिक भारत नावाला जास्त प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कंपनीचे स्पष्टीकरण
डार्ट प्लसचे नाव बदलून भारत डार्ट केल्यानंतर कंपनीने म्हटले आहे की, कंपनीकडून घेण्यात आलेला हा निर्णय सध्याच्या प्रवासात राजनैतिक बदलात महत्त्वाचा ठरेल. भारत डार्ट हे आमच्या कंपनीसाठी आणि देशासाठी एका नवीन, रोमांचक अध्यायातील पहिले पाऊल आहे. आमच्यासाठी डार्ट प्लस अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता कंपनी, भारत डार्ट भारतातील एक्सप्रेस लॉजिस्टिक सेवेला पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज झाले आहे.
शेअर्समध्ये तेजी
ब्लू डार्टने घेतलेल्या निर्णयानंतर बुधवारी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. आज इंट्राडे ट्रेडमध्ये कंपनीचे शेअर्स सुमारे 3 टक्के म्हणजेच 150 रुपयांनी वाढून 6,778.60 रुपयांवर पोहोचले आहे. आगामी काळात शेअर 8871 वर देखील जाऊ शकतात. मुख्य म्हणजे, ब्लू डार्टने भारत डार्ट नावात रूपांतर केल्यानंतर गुंतवणूकदारांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून देशात भारत आणि इंडिया नावावरून वाद सुरु आहे. अलीकडे झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेमप्लेटवर इंडियाऐवजी भारत नाव झळकले. यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एका आमंत्रण पत्रिकेत स्वतःचा उल्लेख “भारताचे राष्ट्रपती” असा केला होता. तिथूनच भारत आणि इंडिया या वादाला सुरुवात झाली. आता या वादाचे पडसाद वेगवेगळ्या क्षेत्रात दिसायला लागले आहेत.