हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण औरंगाबाद येथे होणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील क्रांती चौकात शिवरायांचे पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून क्रांती चौकातील या नव्या पुतळ्याची प्रतिष्ठापना व्हावी, यासाठी शिवप्रेमींची प्रतीक्षा सुरु होती. जानेवारी महिन्यात औरंगाबाद शहरात हा पुतळा दाखल झाल्यानंतर कधी एकदा महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं दर्शन होईल, याची वाट प्रत्येक औरंगाबादकर पहात होता. पुतळ्याचे अनावरण कधी करायचे, याबद्दल अनेक दिवस निर्णय होऊ शकला नाही. अखेर 18 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने रात्री दहा वाजता या पुतळ्याचे लोकार्पण आयोजित करण्यात आले आहे.
अनावरण सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई प्रत्यक्षात उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासह स्थानिक खासदार आणि आमदारांना या सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता औरंगाबादेत येतील. साडेदहा वाजता क्रांती चौकात पोहोचतील.