हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे ते कधी होणार? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार हा उद्या मंगळवारी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन हे दि. 10 ते 17 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन यापूर्वी 18 जुलैपासून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले होते. मात्र, शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यामुळेच हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान आज विधिमंडळ सचिवांनी पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आली.
शिंदे- फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाला असून खातेवाटप निश्चित झाले असून उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभुमीवर पावसाळी विधानसभेचे अधिवेशन दि. 10 ऑगस्टपासून मुंबईत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.