व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यातून 2 लाख युवकांचे डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार – शिवराज मोरे

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसने कराड शहरातील रस्त्यावर उतरत आंदोलन केले. २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा करणाऱ्या मोदींनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग जर गुजरातला पळवले तर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांनी करायचं काय ? त्यापेक्षा आम्ही अभ्यास करून मिळविलेले डिग्री सर्टिफिकेट तुम्हालाच पाठवून देतो असे परखड वक्तव्य यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस राज्यभर आज मोदींचा वाढदिवस “बेरोजगार दिन” म्हणून साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून कराडमध्ये आंदोलन केले जात आहे.

मुंबईचे आणि आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी केंद्राकडून सातत्याने आपल्या इथले प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आहेत . या विरोधात काँग्रेस आंदोलन करणार असून राज्यातून २ लाख युवकांच्या डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार असल्याचे यावेळी शिवराज मोरे यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेसचे अमित जाधव, दिग्विजय पाटील, शिवराज पवार, अमोल नलवडे, दिग्विजय सूर्यवंशी , प्रकाश पिसाळ, अभिजीत पाटील, महेश पवार, गणेश सातारकर, मोबीन बागवान, गणेश गायकवाड, मुकुंद पाटील , आदित्य कुडाळकर ओंकार चव्हाण, अब्रार मुजावर,आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शिवराज मोरे म्हणाले कि, केंद्रातील मोदी सरकारच्या दबावाला बळी पडून राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने 1 लाख 58 हजार कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला घालविला. वेंदाता-फॉक्सकॉन प्रकल्प पुण्यातील तळेगाव येथे होणार हे ठरले होते. गुजरातपेक्षा चांगलं वातावरण महाराष्ट्रात असताना राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातला नेला गेला. महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात गेला याला सर्वस्वी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार आहे. या विरोधात आम्ही युवक आंदोलन करत आहोत. त्याचाच भाग म्हणून २ लाख युवकांच्या डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार आहोत आणि त्या २ लाख युवकांचे काय करायचा याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असेही शिवराज मोरे यांनी म्हंटल.