Tuesday, June 6, 2023

लेबर कॉलनीवर कारवाईस जिल्हा प्रशासन सरसावले

औरंगाबाद – विश्वास नगर लेबर कॉलनी तील साडे तेरा एकर जमिनीवरील सदनिका पाडण्यासाठी काल जिल्हा प्रशासन सरसावले. 147 याचिकाकर्त्यांच्या सदनिका वगळून उर्वरित अनधिकृत आणि जे प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत त्यांच्या सदनिका ताब्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. आज पासून पाडापाडी सुरुवात होण्याची शक्यता आहे.

8 नोव्हेंबर 2019 रोजी जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने नोटीस दिली. परंतु अनधिकृत आणि अधिकृत ताबेदार यांच्या कागदपत्रांची छाननी व न्यायालयीन प्रकरणामुळे कारवाई थांबवावी लागली. शासकीय निवासस्थाने 70 वर्षे जुनी व धोकादायक झाल्याने इमारतींवर बुलडोजर फिरवण्याची प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. अब्जावधी रुपयांचे बाजार मूल्य असलेली ही जागा सरकारची असून नागरिक तेथे अनाधिकृतपणे राहत असल्याने प्रशासनाने कारवाईची भूमिका घेतली आहे.

लेबर कॉलनीतील कॉर्टर्सधारकांमधील 148 याचिकाकर्ते आहे. तेथील बहुतांश सदनिका बळकावण्यात आल्या आहेत. त्याचे भाडे कब्जेदार घेत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वीजपुरवठा पाणीपुरवठा मालमत्ता कर यापैकी काहीही बाबींचा लाभ नाही. शिवाय ती शासकीय जागा असल्याने सध्या तेथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहेत अनेक सदनिका परस्पर विकल्या आहेत. ही शासनाची फसवणूक असल्याने प्रशासनाने जागा ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.