किसनवीर कारखान्यांचा निवडणूक बिगूल वाजला : सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवारपासून, (दि. 28) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर 3 मे रोजी मतदान व 5 मे रोजी निकाल लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किसन वीर कारखाना बंद आहे. या भागातील शेतकऱ्यांना कारखाना बंदचा फटका बसला असल्याने आता निवडणूकीत कशी लढत होणार याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून आहे.

राज्य सहकारी प्राधिकरणाने किसनवीरच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमाला प्राधिकरणाने अंतिम मंजुरी दिली आहे. किसनवीर कारखान्याच्या एकूण 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये व्यक्‍ती ऊस उत्पादक सभासद गटातून भुईंज 3, वाई व जावली 3, सातारा 3 व कोरेगाव 3 असे 15 संचालक, उत्पादक संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्र्रतिनिधी गटातून 1, अनुसूचित जाती, जमाती 1, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग राखीव 1, वि.जा., भ.ज. 1 असे 21 संचालक निवडले जाणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून किसनवीर सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे. कारखान्याने शेतकर्‍यांची व कामगारांची कोट्यवधींची देणी दिलेली नाहीत. तसेच कारखान्यावर 800 कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे कारखान्याला कोणत्याच बँकेने कर्ज न दिल्याने यावर्षी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होवू शकला नाही. कारखाना सुरू न झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, यासाठी नेतेमंडळींकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. अशा वातावरणात किसनवीर कारखान्याची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कारखाना निवडणूकीत आ. मकरंद पाटील व विद्यमान अध्यक्ष मदनदादा भोसले पॅनल टाकणार का? याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

दि. 28 मार्च ते 1 एप्रिल : अर्ज दाखल करणे, दि. 4 एप्रिल : अर्जांची छाननी, दि. 5 एप्रिल : पात्र उमेदवारांची यादी, दि. 5 ते 19 एप्रिल : अर्ज माघारीची मुदत, दि. 20 एप्रिल : उमेदवारांची अंतिम यादी, दि. 3 मे : मतदान, दि. 5 मे : मतमोजणी (निकाल)