सातारा | सातारा व जावळी तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी राजकीयदृष्ट्या महत्वाचा असलेला शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आजपासून (बुधवार) ता. 21 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. कारखान्याच्या संचालक पदासाठी 17 जुलैला प्रत्यक्ष मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिली.
शेंद्रे- शाहूनगर येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची नोटीस उद्या (बुधवारी) कारखान्याच्या कार्यस्थळावरील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्यापासून 21 जूनपर्यंत असेल.
ता. 22 जूनला दाखल अर्जाची छाननी होईल. ता. 23 जून ते 7 जुलै या कालावधीत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 8 जुलैला दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप होईल. प्रत्यक्ष मतदान 17 जुलैला सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत होईल. 19 जुलैला सकाळी आठ वाजता मतमोजणी होईल. अजिंक्यतारा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत आली आहे, तेव्हा तीच परंपरा कायम राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.