कराड | बँकेतील कर्मचाऱ्याने थोबाडीत मारल्यामुळे संतप्त झालेला ग्राहक धारदार चाकू घेऊन बँकेत घुसला. आधार कार्ड लिंक करण्यावरून हा वाद झाला. त्यावेळी बँक व्यवस्थापकांसह इतर ग्राहकांनी संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरातील एचडीएफसी बँकेच्या शाखेत 1 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सचिन रामा भिसे (रा. विजयनगर-मुंढे, ता. कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बँकेचे व्यवस्थापक अमित काशिनाथ मोती यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हापूर नाक्यावर असलेल्या कराड- मलकापूर एचडीएफसी बँकेच्या शाखेत अमित मोती हे व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहेत. सोमवारी बँकेचे दैनंदिन काम सुरू असताना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बँकेत आरडाओरडा सुरू असल्याचे व्यवस्थापक मोती यांच्या निदर्शनास आले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता एक ग्राहक संदीप भस्मे या बँक कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत असल्याचे त्यांना दिसले. याचदरम्यान कर्मचारी संदीप भस्मे यांनी त्या ग्राहकाच्या थोबाडीत मारली. व्यवस्थापक मोती यांनी त्याठिकाणी धाव घेऊन संबंधित ग्राहकाला आपल्यासोबत केबिनमध्ये नेले. त्याच्याशी त्यांनी चर्चा केली असता संबंधित ग्राहक आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत आल्याचे त्यांना समजले. तसेच कर्मचारी भस्मे यांनी थोबाडीत मारल्यामुळे संतप्त झालेला तो ग्राहक भस्मे यांचा खून करणार असल्याचे म्हणत होता.
व्यवस्थापक मोती यांनी त्याला तसे न करण्याबाबत समज दिली. मात्र, त्यांचे काहीही न ऐकता तो ग्राहक बँकेतून निघून गेला. तसेच पाच मिनिटात हातामध्ये चाकू घेऊन तो बँकेमध्ये आला. त्यावेळी सुरक्षारक्षक तसेच इतर ग्राहकांनी त्याला पकडले. घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी संबंधिताला ताब्यात घेतले. याबाबतची नोंद कºहाड शहर पोलिसात झाली आहे.