राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला ठरला? कोणाच्या वाट्याला किती जागा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. त्यानंतर राज्यात लवकरच राज्यपालांकडून 12 आमदारांची नियुक्ती करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. राज्यात शिंदे फडणवीस आणि अजित पवारांचे सरकार असून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार असतील याबाबत नेत्यांच्या कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोचली आहे. त्याच दरम्यान, आता आमदारांच्या नियुक्तीचा नवा फॉर्म्युला समोर येत आहे.

राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट यांची सत्ता असली तरी भाजपच्या आमदारांचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे राज्य नियुक्त १२ आमदारांमध्ये भाजपच्या वाट्याला 6, एकनाथ शिंदे गटाला 3 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून ते संपल्यानंतर या १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जागा वाटपामुळे तिन्ही पक्षांच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटला असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले होते. महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या काळापर्यंत तत्कालीन राज्यपाल भगत सिंह कोशारी यांनी ठाकरे सरकारकडून देण्यात आलेल्या नावांची यादी मंजूर करण्यात आली नव्हती. यावरून ठाकरे सरकारमध्ये आणि कोश्यारी यांच्यात सातत्याने वाद पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यपालांवर अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.

अखेर या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तेव्हा सुप्रीम कोर्टाने देखील दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून 12 आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली. यानंतर राज्यात लवकरच या 12 आमदारांची नावे समोर येतील अशी चर्चा रंगली होती. आता अनेक वादविवादानंतर भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. या जागा वाटपानंतर ३ पक्षांच्या १२ आमदारांची देखील नावे लवकरच जाहीर करण्यात येतील असी शक्यता वर्तवली जात आहे.