औरंगाबाद – संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या तोंडोळी प्रकरणातील महिलांवर अत्याचार करून लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा आबाद ग्रामीण पोलिसांकडून आज पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोपींकडून औरंगाबाद ग्रामीण व शहर हद्दीतील कॉल तेरा गंभीर गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, 19 ऑक्टोबर च्या मध्यरात्री बिडकीन पोलिस हद्दीतील तोंडोळी शिवारात दरोडेखोरांनी दगडाने व कुर्हाडीने फिर्यादी सह कुटुंबियांना मारहाण करून घरातील 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून महिलांवर अत्याचार केले होते. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलीस अधिक्षक निमित गोयल यांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळे पथक स्थापन करून सदर होण्याचा समांतर तपास करत होते. यात त्यांना खात्रीलायक माहिती मिळाली की, हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रभू शामराव पवार यांनी त्याच्या साथीदारांसह केला आहे. मिळालेल्या या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रभू शामराव पवार याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले त्यानंतर त्याची विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखविताच हा गुन्हा त्याचे साथीदार विजय जाधव, किशोर जाधव, सोमीनाथ राजपूत, अनिल राजपूत, नंदू बोरसे आणि आणखी एका साथीदारांसह केल्याची कबुली दिली. तर पोलिसांनी या गुन्हेगारांचा वेगवेगळ्या ठिकाणांवरून शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपींनी औरंगाबाद जिल्ह्यात व शहरात गुन्हा केल्याची कबुली दिली. यानुसार त्यांनी बिडकीन, पाचोड, चिकलठाणा, गंगापूर, विरगाव, एमआयडीसी सिडको व दौलताबाद या पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घातल्याचे रेकॉर्डवरून समजले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे बिडकीन पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.