हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिन्यातील कडक दूपार होती ती. आमची रेल्वेगाडी कसारा स्टेशनला थांबलेली होती. “डोंगराची काळी मैना…डोंगराची काळी मैना” असं मोठमोठ्याने ओरडत…हातात कसल्याशा टोपल्या घेऊन, काही महीला गाडीच्या प्रत्तेक बोगीच्या खिडकीमधे डोकावून कोणी त्यांची करवंद घेतंय काय ते पाहत होत्या. रेल्वेगाडी स्टेशनावरती येताच लगबगीने हलकेपणाने या बोगीतून त्या बोगीच्या खिडक्यांकडे धावणार्या त्यांच्या चेहर्यावरती थोडा थकवा जाणवत होता. आतमधे गेलेले त्यांचे डोळे त्यांनी डोंगर-दर्या पायी पालत्या घालून ती करवंद गोळा केली आहेत याचे द्योतक होते.
या गर्दीपासून दूरवर एका खांबाला टेकून करवंद विकणारी त्यांच्यातलीच एक महिला शांतपणे उभी राहीलेली होती. हातात करवंदाने गच्च भरलेली पाटी घेतलेल्या तीची नजर एखाद्या फुलपाखरासारखी भिरभिरत होती. कोणीतरी आपल्याला हाक मारेल अन् आपली करवंद घेईल असं तिला वाटत होतं. एका खिडकीमधून दुसर्या खिडकिमधे ती नजरेनेच दूरवरुनंच डोकावत होती. पळसाच्या हिरवेगार हँडमेड द्रोणात काळेभोर करवंद शोभून दिसत होते.
तेवढ्यात कुणीतरी जोरात ‘ओ बाई’ अशी आरोळी दिली..ती लगबगीने आवाज आलेल्या खिडकीजवळ गेली. कोणीतरि आपली करवंद घेतंय या विचारानं ती नकळत थोडीशी हारकली होती. चेहर्यावरच्या त्या आनंदी छटेसह ती त्या बोगीच्या खिडकीजवळ आली. 10 रुपयेला एक द्रोण याप्रमाणे तीने 7 द्रोण करवंद विकली. सत्तर रुपयेची कमाई झाल्याने आता तिच्या गालावर एक छान पुसटशी कळी पडलेली होती. त्वचेवर अमावस्या पांघरून ती निर्भीड रात्रीसारखी स्वच्छ होती. चेहर्यावर चांदण्या गोंदलेल्या होत्या. गाडी फ्लेटफोर्मवर येताच पळता यावं म्हणुन तिने तिची साडी गुडघ्यापर्यंत खोचलेली होती. पदर कसाबसा खांद्यावर टाकलेला होता.
डोंगर-दर्यांतून करवंद गोळा करत असताना करवंदिच्या त्या काट्यांनी जागोजागी फाटलेला पदर ओबडधोबड तीचे उर झाकत होता. आता गाडी सुटायची वेळ झाली होती. आणखीन कोणी करवंद घेतंय का ते पहाण्यासाठी बोगीच्या आजुबाजुच्या खिडक्यावरुन ती पुन्हा एकदा नजर फिरवत होती. तेवढ्यात माझ्या कंपार्टमंट मधे बसलेल्या अन् मगापासून तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पहाणार्या कोणीतरी तीच्या कंबरेकरता अश्लील शब्द वापरला. तिच्या शरिरावरती अश्लिल टीपन्नी केली.
ती मात्र यापासून अलिप्तपणे करवंद विकत होती. रात्री चटणी कोरडी न खाता छटाकभर तेल तरी आणता येईल या आशेने ती उभी होती. डोळ्यावर धूकं पांघरलेल्या पांढरपेशा समाजाला तिचा कमनीय बांधा दिसला पण अंगावरचे जागोजागी असलेले काट्यांचे ओरखडे नाही दिसले.
तेवढ्यात ट्रेनची व्हिसल वाजली आणि मी माझ्या विचारांच्या तंद्री मधुन बाहेर आले. मंदपणे वेग वाढत निघालेल्या गाडीच्या लोखंडी गज असलेल्या त्या खिडकीमधुन मी तिला पाहण्याकरता बाहेर डोकावले. स्टेशन पुन्हा अगोदरसारखे सामसूम झाले होते. हातातले ७० रुपये पदरामधे खोचत ती दुरवर तशीच उभी होती. जणु ते अश्लिल शब्द तिला एकुच गेले नव्हते…जणु तसल्या अश्लिल टिपन्न्या रोजच्याच होत्या तिच्यासाठी. इतक्या वर्षांमधे फ्लेटफोर्मवर करवंद विकताना तिने अशा किती किळसवाण्या नजरांना तोंड दिलंय कोणास ठावूक. तिला आता त्या नजरांचं अन् त्या अश्लिल टिपण्यांच काहिंच वाटेनासं झालंय भोइतेक असो. ७० रु कमरेला खोचल्यावर मात्र मगाशी दमल्यासारखा दिसणारा तिचा चेहरा जरा तजेलदार वाटायला लागला होते एवढं नक्की.
द इनव्हिजिबल इंडियन फेसबुक पेजवरुन साभार
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.