सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
प्रतापगड येथे शिवप्रताप दिनास खा. छ. उदयनराजे भोसले हे निमंत्रण नसल्याने आले नसल्याचे बोलले जात आहे. यावर आज आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. शेवटी किल्ला आपला आहे, देवस्थान आपलं आहे आणि आपल्याला घराण्याचा वारसा आहे. मग निमंत्रणाची वाट आपण कशाला बघायची, असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झालेल्या शिवप्रताप दिनास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते. मात्र खा. छ. उदयनराजे भोसले हे अनुपस्थित होते. त्यावर शिवेंद्रसिहराजे म्हणाले, निमंत्रण वगैरे या ऑफिशियल गोष्टी आहेत. मला जिल्हाधिकारी ऑफिस कडून पत्रिका आलेली होती. एवढेच मला निमंत्रण होतं, असं काही कोणी मला न्यायला गाडी घेऊन आले नव्हतं. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम आहे. प्रतापगड पायथ्याशी अफजलखान कबरीजवळ जो काही अतिक्रमणाचा विषय होता, तो निकालात निघाला असल्यामुळे लोकांच्यात एक वेगळी भावना होती. आपण ज्या घराण्यातून आहोत, त्या घराण्याचा वारसा आहे. आपल्याला त्या घराण्यातील कार्यक्रमासाठी निमंत्रणची वाट कशाला पाहायची. मला कुठे काही विशेष निमंत्रण आले होते? तरीही मला केवळ पत्रिका आली, त्यावर मी उपस्थित राहिलो होतो.
ज्या घरातील आपण आहोत. तेथील कार्यक्रमासाठी मला मुख्यमंत्र्यांनी बोलावलं पाहिजे, आणखीन कोणी तरी बोलायला पाहिजे असं कशाला? तेथील देवस्थान राजघराण्याच्या ताब्यात आहे. मग आपल्या देवीला जायला, कशाला निमंत्रणाची गरज आहे?. शेवटी जे आपलं आहे, तिथे जायला निमंत्रणाची काय गरज आहे. तसेही कलेक्टर ऑफिसने त्यांच्याकडे पत्रिका पोचवलेली होती आणि पत्रिकेतही उदयनराजेंचं नाव होतं. तेव्हा शेवटी किल्ला आपला आहे, देवस्थान आपलं आहे आणि आपल्याला घराण्याचा वारसा आहे. मग मग निमंत्रणाची वाट आपण कशाला बघायची, असे शेवटी आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.