औरंगाबाद – उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या सिडको एन-4 भागात राहणाऱ्या एका अभियंत्यांचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेला. हे कुटुंब उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते तेव्हा चोरट्यांनी 19 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुंडलिक नगर पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर 30 तासांनी गुन्हा नोंदवला.
पुंडलिक नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोप्पाक व्यंकट नरसिंह स्वामी (मुळ रा. विशाखापट्टणम, ह.मु. एन-4 सिडको) हे शेंद्रा एमआयडीसी अभियंता आहेत. 14 एप्रिल रोजी ते पत्नी व सात वर्षांच्या मुलासह मध्यप्रदेशातील उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. 15 रोजी सकाळी घरमालकाने स्वामी यांना फोनवर त्यांच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडले असून दार उघडे आहे. आत सामान अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे सांगितले. त्यावर स्वामी यांनी त्यांना पोलिसांना कळविण्यास सांगितले, तसेच ते औरंगाबादच्या दिशेने निघाले. 15 एप्रिल च्या मध्यरात्री एक वाजता ते घरी पोहोचले. तेव्हा कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले सर्व सोने, हिरे, चांदीचा मुद्देमाल दिसून आला नाही. हा मुद्देमाल ठाण्यात नोंद घेतल्या नुसार 16 लाख 14 हजार 254 रुपयांचा आहे. मात्र, सध्याची किंमत ही 19 लाख रुपयांची असल्याची माहिती स्वामींच्या वकिलांनी दिली. शनिवारी सायंकाळी गुन्हा नोंदवला गेला. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक शेषराव खटाणे करत आहेत.
2019 नंतर सर्वात मोठी चोरी –
डिसेंबर 2019 मध्ये एन-4 येथील डॉ. नामदेव कळवळे यांचा बंगला चोरट्यांनी फोडून 78 तोळे सोने आणि 4 लाख 75 हजारांची रोकड चोरली होती. याचा तपास तत्कालीन ठाणेदार घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने 20 दिवसांमध्ये केला होता. त्यानंतर आता ही मोठी चोरी झाली.