दोन्ही मुलींसमोर पतीने केली पत्नीची चाकू भोसकून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीमध्ये एका पतीने आपल्या दोन मुलींसमोर पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दिल्लीतील जाफराबाद भागात ही घटना घडली आहे. ज्यावेळी पती आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या करत होता त्यावेळी त्याच्या दोन मुली देखील घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचा मोठा धक्का या दोन्ही मुलींना बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी निशा आणि तिचा पती साजिद आपल्या दोन मुलींसह दिल्ली येथील जाफराबाद परिसरात राहत होता. त्यांना एक 11 आणि 10 वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून काम बंद पडल्यामुळे साजिद घरीच बसून होता. या काळात तो निशावर संशय घेऊ लागला. त्यामुळे या दोघांमधील वाद देखील वाढू लागले. शनिवारी या दोघांचे वाद टोकाला पेटले. या वादात साजिदने पत्नी निशावर चाकूने वार केले. त्याने वारंवार पोटावर, मानेवर, छातीवर चाकूने वार केले ज्यात तिचा मृत्यू झाला.

दोन्ही मुलींसमोर आईची हत्या

आरोपी साजिद आपल्या पत्नीची हत्या करत होता तेव्हा त्याच्या दोन्ही मुली देखील घरात उपस्थित होत्या. यातील मोठ्या मुलीने आपल्या वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला देखील यात दुखापत झाली. शेवटी या दोन्ही मुली आपल्या आईला वाचवू शकल्या नाही. ज्यावेळी निशाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना दिली. सध्या या प्रकरणात पोलिसांनी आरोपी साजिदला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.