कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील
कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गटात दुरंगी लढत होत आहे. पश्चिम सुपने येथील ग्रामपंचायत निवडणुकीत 44 लाखांची पाणी योजनेचा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरू लागला आहे. सत्ताधारी गटाकडून विकास कामांना खो घातला गेल्याचा आरोप विरोधी राष्ट्रवादी गटाचे प्रमुख साहेबराव गायकवाड यांनी केला आहे.
पश्चिम सुपने ग्रामपंचातीत 7 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी 2 उमेदवार आमनेसामने उभे आहेत. सत्ताधारी उंडाळकर गट 35 वर्ष सत्तेत होता. तर एक टर्म केवळ 5 वर्ष राष्ट्रवादी गटाला सत्ता मिळाली होती. त्यामुळे आता पुन्हा सत्तांतर करण्यासाठी विरोधी जोमलिंग ग्रामविकास परिवर्तन पॅनेलकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर सत्ताधारी रयत ग्रामविकास पॅनेलही आपले मुद्दे घेवून मतदारांच्या समोर जात आहेत. राष्ट्रवादीचा गट खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हा बॅंकेचे संचालक, युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जात आहे.
गावचा विकास हाच, आमचा मुद्दा : साहेबराव गायकवाड
गेल्या 10 वर्षापासून 44 लाख रूपयांचा पाणी प्रश्न रखडलेला आहे. गेल्या पाच वर्षात पाईपलाईनचे काम सुरू असून पीव्हीसी पाईप टाकली आहे. तसेच पाईपलाईनचे काम करत असताना अद्याप टाकी कुठे उभी करायची हे सत्ताधारी ठरवू शकले नाहीत. गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून डांबरीकर उखडले आहे. पश्चिम सुपने गावात गेल्या 10 वर्षात एकही घरकुल आलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी गावाचे रखडलेले प्रश्न आम्ही सोडवून पुन्हा विकासकामांची गंगा गावात आणू असे राष्ट्रवादी गटाचे प्रमुख साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.