विशेष प्रतिनिधी | सुरज शेंडगे ,
नैसर्गिक आपत्ती आल्यास किड्या मुंगी सारखी माणसे मरतात याचाच प्रत्येय भारताला सर्व प्रथम किल्लारीच्या भूकंपात आला. किल्लारी गावाजवळच्या एकोंडी गावी ३० सप्टेंबर १९९३च्या पहाटे ३. ५५ मिनिटाने जोराचा आवाज झाला आणि क्षणार्धात होत्याच नव्हते झाले. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ गावे भुईसपाट झाले. २९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती आणि लोक गणेश विसर्जन करून रात्री झोपले असता हा प्रकार घडला. त्यामुळे आजही गणेश विसर्जनाच्या रात्री लोक भूकंपाच्या दहशतीखाली असतात.
किल्लारी जवळ झालेल्या या भूकंपाचे हादरे लातूर जिल्ह्यापासून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला बसले होते. या संदर्भात उल्लेख तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपले आत्मवृत्त ‘लोक माझे सांगाती’ यामध्ये केला आहे. शरद पवार लिहतात, “लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावाजवळ झालेला भूकंप एवढा तीव्र होता की त्याच्या कंपन लहरी थेट मुंबईपर्यंत येऊन पोचल्या होत्या. मुंबई येथील वर्षा निवासस्थानी काचेच्या तावदानाच्या काचा या भूकंपात तुटल्या होत्या. तर लातूरमध्ये त्याची भीषणता नसांगण्या सारखीच होती. भूकंप होताच आम्ही तातडीने लातूरकडे रवाना झालो.”
किल्लारी ते मुख्यमंत्र्यांचे निवास स्थान वर्षा बांगला अंतर ५२९ किलो मीटर आहे. एवढ्या लांब भूकंपाचे हादरे बसले तेव्हा किल्लारी जवळची २० गावे भुईसपाट झाली होती. एकाच घरातील १४-१४ माणसे दगावली होती. या सर्वांचे सरकारच्या वतीने सामुहिक अंत्यसंस्कार केले. तेव्हा दगावलेल्या कुटुंबियांचे नातेवाईक आपल्या लोकांच्या मृतदेहावर पडून रडत होते. काळीज हेलावून टाकणारे दृश्य चित्रफितीद्वारे आज जरी पाहीले तरी डोळे पाण्याने भरून येतात. १९९३ पर्यंत देशात आलेली ही सर्वात मोठी आपत्ती होती. या भूकंपात दगावलेल्या लोकांचा आकडा बघूनच आपल्याला याची भीषणता लक्षात येते. किल्लारीच्या भूकंपात ७ हजार ९२८ लोक मृत तर १६ हजार लोक जखमी झाले होते. तर या भूकंपात १५ हजार ८५४ पाळीव जनावरे गतप्राण झाली होती.
किल्लारीच्या भीषण भूकंपाची आठवण घेऊन आजही येथील लोक दुःखी अंतःकरणाने जगत आहेत. तेव्हा भुई सपाट झालेल्या गावांचे भग्नावशेष आज देखील तसेच्या तसे बघायला मिळतात. अगदी गावच्या गाव नव्या जागी वसवली गेली आहेत. तर भूकंपाच्या आठवणी काढताच येथील लोकांचे डोळे आजही पाण्याने भरून येतात. म्हणूनच गणेश उत्सवाच्या शेवटी येणाऱ्या विसर्जनाच्या दिवशी आजही लोक भूकंपाच्या दहशतीच्या सावटाखाली असतात.