सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणारा नराधम पती सुरेश बापू कांबळे यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस.एस.सापटणेकर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली.
‘सदरचा गुन्हा कानडवाडी ते कुपवाड एमआईडीसी रस्त्यावर १२ जुलै २०१६ रोजी घडला होता.यातील फिर्यादी सौ.सविता सुरेश कांबळे हिचे सुरेश सोबत १४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते.सुरेश हा गवंड्याच्या हाताखाली मजुरी करीत होता. घटनेपूर्वी १ महिन्यापासून तो सविताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. घटनेदिवशी सकाळी सुरेशने सविताला शिवीगाळ व मारहाण करून आज तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन घरातून निघून गेला होता.त्याच्या धमकीमुळे सविताने घाबरून मैत्रिणीच्या मोबाइलवरून आईला फोन करून नवर्याने दिलेल्या धमकीबाबत सांगून माहेरी घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर सविताची आई तिला घेऊन जाण्यासाठी काननवाडी येथे आली.
सविताची आई तिला घेऊन एमआईडीसी रस्त्यावरून चालत निघाली होती. त्यावेळी सुरेश हा त्यांच्या पाठीमागून सायकलवरून आला. त्याने खिशातून चाकू काढून पत्नी सविताच्या डाव्या मांडीवर, डाव्या हाताच्या दंडावर आणि मनगटावर वार करून तो सायकलवरून पळून गेला. सविताच्या फिर्यादीच्या आधारे कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भक्कम पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ.सापटणेकर यांच्यासमोर सुरु होती. सदर साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली.