हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारकडून दिरंगाई होत असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान आज खासदार संभाजीराजे छत्रपती व खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यानंतर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणप्रश्नी घेण्यात येणाऱ्या मेळाव्याबाबत माहिती दिली. तसेच माओवाद्यांनी आरक्षणप्रश्नी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्राबाबत राज्य सरकारसाठी हे पत्र म्हणजे धोक्याची घंटाच म्हणावे लागेल, असे मेटे यांनी म्हंटले.
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारला इशारा देत शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी मोर्चे काढले आहेत. त्यानंतर त्यांनी राज्यभर मेळावे घेण्याचे नियोजन केले आहे. याबाबत मेटे यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. यावेळी मेटे म्हणाले, ” मराठा आरक्षणासाठी आपण राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये मेळावे घेणार आहोत. आरक्षणासाठी येत्या २६ जून रोजी औरंगाबाद इथे मेळावा घेतला जाईल. त्यानंतर सोलापूरमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेतला जाईल. मेळावा घेतल्यानंतर विभागीय कार्यालयांवर देखील मोर्चा काढणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.
राज्य सरकारला यापूर्वीही अनेकवेळा आरक्षणाच्या प्रश्नी इशारा दिला आहे. आता ५ जुलैपर्यंत जर राज्य सरकारने आरक्षणासह इतर प्रश्न सोडवले नाहीत तर ७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. हि गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी, असा इशारा यावेळी मेटे यांनी दिला. यावेळी मेटे यांनी माओवाद्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी पाठिंब्याच्या दिलेल्या पत्राबाबतही मत व्यक्त केले. “माओवाद्यांच्या सहनभूतीच्या जाळ्यात पिचलेले मराठा तरुण सापडले तर सामाजिक दृष्टीने महाराष्ट्राचे नुकसान होईल. माओवाद्यांच्या प्रश्नावर एकही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही हे दुर्दैव,” असेही मेटे यावेळी म्हणाले.