सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
गेल्या आठवड्यात बागणी येथे ऊसतोडणी मशीन जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आज आष्टा येथे ऊसतोडणी मशीन जळाले. आष्टा येथे श्री दत्त इंडिया वसंतदादा कारखाना यांच्याकडून परिसरात ऊस तोडणी सुरू होती. ऊस तोडणी मशीनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने मशीन संपूर्ण मशीन जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साठ लाखाचे नुकसान झाले. शेतातच तोडणी मशीन ला आग लागल्याने या वेळी परिसरातील सुमारे तीस एकर तोडणीयोग्य ऊस जळून खाक झाले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
आष्टा परिसरातील हाबळ वाट या परिसरात वसंतदादा कारखाना दत्त इंडिया यांच्यावतीने ऊस तोडणी मशीनचा करार करून आष्टा परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास राजकुमार श्रीपाल थोटे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना ऊस तोडणी मशीन मालक गोरख नामदेव शेंबडे रा. कोठेवाडी ता. सांगोला हे चालक म्हणून काम करीत होते. ऊस तोडणी मशीन मध्ये शॉर्टसर्किट झाले. न्यू हॉलंड कंपनीच्या या मशीनने अचानक पेट घेतला. यात मशीन जळून खाक झाले.
सुमारे सव्वा कोटीचे मशीन असून शॉर्ट सर्किट मध्ये सुमारे ६० लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पेट घेतलेल्या मशीनच्या परिसरातील आप्पासाहेब वग्याणी, आनंदराव सव्वाशे यांच्यासह नजीकच्या शेतकऱ्यांचे पंचवीस ते तीस एकरमधील ऊस पेटून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आष्टा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी तातडीने येऊन आग आटोक्यात आणली. सततच्या पावसाने शेतात ऊसतोडणी मशीन चालू न शकल्याने या धंद्यात मंदीचे सावट असताना सध्या शेतात घात आल्याने मशीन तोडणीस सुरवात झाली होती. तो पर्यंतच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.