सत्तास्थापनेत ट्विस्ट : दहिवडी नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेवकाचे अपहरण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दहिवडी येथे नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडींनी वेग घेतला आहे. यातूनच पुणे येथे खळबळजनक घटना घडल्यानंतर आज माणचे राजकारण ढवळून निघाले. पुन्हा एकदा माणमध्ये अपहरण नाट्य रंगले. परंतु पुण्यातील चाकण पोलिसांनी अपहरणाचा डाव काही तासातच हाणून पाडला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीने विरोधकांना आम्हीही काही कमी नसल्याचा प्रत्यय दिला.

दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत सध्या अपक्षासह राष्ट्रवादीकडे 9 सदस्यांची बेरीज आहे. त्यामुळे प्रभाकर देशमुख म्हणतील तोच नगराध्यक्ष होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, अशा परिस्थितीतसुध्दा हे पद मिळविण्यासाठी विरोधकांकडून हालचाली सुरू आहेत. यातूनच अपहरणाची नाट्यमय घटना घडली. प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेले अपक्ष राजेंद्र साळुंखे हे राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसह सहलीवर आहेत. तेव्हा काही लोकांनी राजेंद्र सांळुखे यांचे अपहरण केले. ही बातमी समजताच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगरसेवक महेश जाधव कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी एका बेसावध क्षणी राजेंद्र साळुंखे यांना उचलण्यात आले.

सदरची बातमी प्रभाकर देशमुख यांना समजताच त्यांनी अतिशय जलद गतीने हालचाली केल्या. राजकारणातील वजन वापरून वरिष्ठ पातळीवरून सर्व पोलिस यंत्रणा हलवली. वजनदार नेतेमंडळी तसेच अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाल्यावर पोलिस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली. अवघ्या काही तासातच राजेंद्र साळुंखे व अपहरणकर्त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. तोपर्यंत दहिवडी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी श्री. साळुंखे यांच्या कुटुंबीयांसह धाव घेतली होती. मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांसह जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला होता. परंतु, प्रभाकर देशमुख यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तसेच दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी अतिशय शिताफीने सर्व परिस्थिती हाताळून जमाव शांत केला.