हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी वर भाजपमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यात आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे पेटून उठले असून त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तर महाविकास आघाडी सरकारची तुलना म्हशीशी केली. “राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं आहे. याला ढुसणी दिल्याशिवाय ते हलणार नाही,”अशा शब्दात मेटेंनी निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. काल झालेल्या भाजपच्या समितीच्या बैठकीनंतर आता समितीतील सदस्याकडून हळू हळू महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जाऊ लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी लवकर निर्णय घ्यावा व लवकर आरक्षण मिळवून द्यावं, अशी मागणी मराठा समाज बांधवांकडून केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी काँग्रेसनेते अशोक चव्हाण व राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला. “राज्य सरकारने आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न करायचे सोडून हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसले आहे. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही तसेच लवकरच राज्य सरकारच्या विरोधात ४ ते ५ जूनला मोर्चाही काढणार आहोत,” असेही मेटे यांनी म्हंटल होत. त्यानंतर आता थेट महाविकास आघाडी सरकारवरच निशाणा साधला असल्यामुळे त्यांच्या या टीकेला आता महाविकास आघाडीतील नेते काय उत्तर देणार हे पाहावे लागेल.