हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागा व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कालपासून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरु केला आहे. आज दुसऱ्या दिवशी सुरु केलेल्या दौऱ्यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “हे महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या महामारीत पूर्णपणे नापास झाले आहे. हे आत्मघातकी सरकार असून कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी या सरकारकडून लपविली जात आहे.” असा गंभीर आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस यांनी आज दुसऱ्यादिवशी पुन्हा आपल्या दौऱ्याला सुरवात केली आहे. तत्पूर्वी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, मराठा आरक्षणप्रशी महाविकास आघाडी सरकारकडून केला जात असलेला वेळकडाऊपणा अशा अनेक विषयावरून सरकारवर हल्लाबोल केला.
अगोदरच कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत. अशात आता तौक्ते चक्रीवादळामुळे लोकांच्या घराचे, शेती, फळबागांचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई राज्य सरकारकडून यंदा तरी दिली जाईल का? मागील नुकसानीचीही अजून भरपाई दिली नसल्यामुळे लोकांतून मोठ्या प्रमाणात या सरकारबद्दल असंतोष व्यक्त केला जात आहे. मागील वर्षी झालेल्या चक्री वादळात
मोठ्या प्रमाणात अनेक वृक्ष उन्मळून पडली, त्यांना फक्त 100 रुपये प्रत्येक वृक्षामागे मिळाले. घरावरील छप्पर उडाल्यामुळे त्यांना उघड्यावरच दिवस काढावे लागले. या सरकारने त्यांच्या घरावर किमान छप्पर तरी द्यायला हवे होते. मात्र, तेही यांनी दिल नाही. नुकत्याच येऊन गेलेल्या चक्री वादळामुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ठाकरे सरकारला जबाबदारी झटकण्याची सवय
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांनी मोदींवर गुजरात दौऱ्यावरून केलेल्या टीकेला उत्तर दिले. दररोज सकाळी उठायचं आणि टीव्हीसमोर जाऊन खोटं बोलायचं, ही सवयठाकरे सरकारमधील नेत्यांना लागली आहे. या चक्रीवादळाचा लँडफॉल गुजरातमध्ये होता. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जास्त मृत्यू झाले.
या नुकसानीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा तेथील दौरा करण्याचा निर्णय घेतला. गुजरातला जशी मदत जाहीर केली, इतर राज्यांनाही तशीच मदत केली जाईल, हे नक्की आहे. मात्र, त्यामुळे ठाकरे सरकारकडून विनाकारण काहीही आरोप केले जात आहेत. काही झालं की केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकायची सवय झाली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.