मोटारसायकलवरून लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीलाच मारहाण आणि चोरी करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मोटारसायकल वरून लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीलाच जबर मारहाण करून त्याच्याकडील गाडी, मोबाईल आणि सोन्याची अंगठी चोरणाऱ्या आरोपीला सातारा शहर डीबी पथकाने ताब्यात घेतलं आहे. यावेळी सदर आरोपीकडून तब्बल 50 हजार किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी फिर्यादी गणेश बाळासाहेब शिंदे रा. तांबवे ता. फलटण जि. सातारा हे सातारा येथील त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथून एका अनोळखी इसमाने त्यांच्याशी ओळख करून त्यांना अजंठा चौक सातारा येथे मोटारसायकलवरून सोडण्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्या अनोळखी इसमांस स्वतःच्या मोटारसायकलवरून अजंठा चौकाच्या ब्रीज खाली रात्री १०:३० वा. सुमारास सोडले. त्याचवेळी अचानक अनोळखी इसमाने त्यांना लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली व तेथीलच लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतर सदर इसम त्यांची मोटारसायकल, मोबाईल, सोन्याची चैन व अंगठी चोरून घेवून पळून गेला होता. त्यानंतर जखमी गणेश बाळासाहेब शिंदे यांनी औषध उपचार घेतल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस अधिक्षक सो, समीर शेख, मा अप्पर पोलीस अधिक्षक सो, श्री. बापू बांगर, मा. पोलीस उपअधिक्षक साो, शिंदे यांनी सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या. त्याप्रमाणे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकास सदरचा गुन्हा उघडकिस आणणेबाबत सुचना दिल्याने डी.बी. पथकाने सदर गुन्ह्याच्या अनुशंघाने सातारा शहर परिसरातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. त्याप्रमाणे आरोपीचा कसोशीने शोध घेत असताना एका सराईत गुन्हेगाराने सदरचा गुन्हा केल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली. डी.बी. पथकाने त्याच्यावर लक्ष ठेवून त्यास दि. २४/१२/२०२२ रोजी ताब्यात घेतले.

सदरचा आरोपी अत्यंत सराईत असल्याने उडवाउडवीचे उत्तरे देत होता. परंतु पोलीसांनी त्याच्याकडे कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले. सदर गुन्हयातील चोरी केलेली मोटासायकल आणि मोबाइल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. एकूण ५०,०००/- रुपये किंमतीचा ऐवज यावेळी जप्त करण्यात आलेला असून आरोपीकडे अजून चौकशी सुरू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधिक्षक साो, श्री. बापू बांगर, मा. पोलीस उपअधिक्षक साो, मोहन शिंदे, मा. पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे मा. पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, संतोष कचरे, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ तसेच सायबर सेलचे महेश पवार, सुशांत कदम, प्रविण अहिरे यांनी केलेली आहे.