सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आणि प्रयत्नातून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील सात वर्षाच्या हरवलेल्या मुलाच्या कुटुंबाचा शोध घेऊन सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली व चाइल्ड लाईन यांच्या संयुक्त मोहिमेमुळे हरवलेल्या मुलाच्या आई-वडिलांशी संपर्क करुन त्याची पालकांशी भेट घडविणे शक्य झाले.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा घरगुती वाद झाल्यामुळे तो घरातून निघून गेला. तो रेल्वेने विनातिकीट प्रवास करत असताना मिरज पोलिसांना आढळून आला. याबाबत मिरज येथील चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क केला. सांगली विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण नरडेले यांनी अहमदनगर प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे यांच्याशी संपर्क करून मुलाच्या पालकांचा शोध घेण्याबाबत ई-मेल द्वारे कळविले.
या ई-मेलची दखल घेऊन नगर प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी स्थानिक समिती आणि पोलिसांच्या मदतीने पालकांचा शोध घेतला. मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत सदर मुलाला वरीष्ठस्तर दिवाणी न्यायमूर्ती एल.डी.हुली यांच्या हस्ते , प्रमुख न्यायदंडाधिकारी पद्माकर केस्तीकर व विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश प्रवीण नरडेले यांच्या उपस्थितीत भेटवस्तू देऊन त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.