हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा अंतरवली सराटी याठिकाणी पार पडली. त्यांच्या या सभेला मराठा बांधवांकडून मोठा प्रतिसाद देखील मिळाला. दरम्यान, या सभेनंतर आता जरांगे पाटलांची तोफ पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील खेडमध्ये जरांगे पाटलांची पुढील भव्य सभा पार पडणार आहे. येत्या 20 ऑक्टोंबर रोजी खेडमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात जरांगे पाटलांना कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अंतरवली सराटी येथे झालेल्या सभेनंतर जरांगे पाटलांची पुण्यात पहिल्यांदाच भव्य सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यात येऊन जरांगे पाटील कोणावर निशाणा साधतील, याविषयीही तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. सध्या मराठा समाजाच्या प्रश्नांवर आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी जरांगे पाटलांनी आणखी दहा दिवस सरकारला दिले आहे. त्यापूर्वी ते राज्यात वेगवेगळया ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत.
मुख्य म्हणजे, जरांगे पाटलांची पहिली सभा आंतरवाली सराटी येथे पार पडली. या सभेला लाखो मराठा बांधवांनी गर्दी जमवली होती. या सभेनंतर आता पुन्हा जरांगे पाटलांची भव्य सभा खेडमधील राजगुरुनगर येथे पार पडत आहे. या सभेसाठी 100 एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच, या सभेसाठी आत्तापासूनच सर्व तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा आंतरवाली सराटी सभेपेक्षा भव्य असणार असल्याचे म्हटले जात आहे.