कराड | दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी रात्रगस्त घालणार्या पोलिसांनी जेरबंद केली. यामध्ये सांगली येथील रेकॉर्डवरील पाच संशयितांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चोरीचा सुमारे 11 हजारांचा मुद्देमाल व शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. उंब्रज (ता. कराड) पोलिसांनी पहाटे ही कारवाई केली.
पोलिसांनी संशयितांकडून कटावणीसह धारदार शस्त्रे हस्तगत केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी पकडलेले संशयित सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर खून, मारामार्या, दरोडा, हाफ मर्डर यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोहित सुदाम कदम (वय 24, रा. अहिल्यानगर, पो. माधवनगर, सांगली), शैलेश ऊर्फ महादेव तानाजी पडळकर (वय 25, रा. माधवनगर, सांगली) राहुल नागेश कांबळे (वय 30, रा. अहिल्यानगर, पो. माधवनगर.सांगली), किशोर राजु चव्हाण (वय 22, रा. सध्या रा. अहिल्यानगर, पो. माधवनगर, सांगली. मुळ रा. अटके ता.कराड) व अमित अरुण साठे (वय 22, रा. कवलापूर, ता. मिरज) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्रगस्त करणार्या पथकाला सतर्क राहून रात्रगस्त करण्यासाठी सपोनि अजय गोरड यांच्या सूचना होत्या. त्या अनुषंगाने रात्रगस्त पथकाला दुचाकीवरून काहीजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सैनिक बँकेच्या रोडला एका दुकानाच्या आडोशाला कोणीतरी लपून बसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच पोलिस दिसताच त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी दोघांना पकडले. तर अन्य तीन जण पळून गेले. पळून गेलेल्या संशयितांचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांनाही पकडले. यावेळी संशयितांची तपासणी केली असता दरोड्यासाठी वापरण्यात येणारी घातक शस्त्रे यामध्ये दोन लोखंडी कटावण्या, दोन कोयते, मिरचीपुड असे साहित्य त्यांच्याजवळ आढळून आले. पोलिसांनी त्या साहित्यासह दोन दुचाकी असा सुमारे 1 लाख 20 हजार 220 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, संशयितांनी पहाटे सगरे लेडीज शॉपी फोडून सुमारे 10 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. तसेच त्यांनी लेडीज शॉपी शेजारी असणारे कॉम्प्युटर दुकान फोडण्याचाही प्रयत्न केला होता. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तेे सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर मर्डर, हाफ मर्डर, मारामारी, घरफोडी, चोरी, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास सपोनि अजय गोरड करीत आहेत.