कराड विमानतळाच्या आसपासच्या बांधकाम परवानग्यांचा प्रश्न मार्गी : आ. पृथ्वीराज चव्हाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड विमानतळाच्या आसपास 20 किलोमीटरच्या परिघामध्ये कोणत्याही बांधकामावर बंदीच्या अनुषंगाने विमानतळ विकास प्राधिकरणाच्या जाचक अटी काढल्या जाव्यात व त्याचा कलर कोडेड झोनिंग नकाशा लवकरच प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत कराडचे नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची व भारतीय विमानपतन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांची भेट घेतली. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक शिवराज मोरे, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, क्रिडाईचे तनय जाधव, कराडचे नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, जावेद शेख, धनराज शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तात्काळ महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून कलर कोडेड नकाशा प्रसिद्ध करण्याच्या व त्यानुसार बांधकाम बाबतच्या अटी शिथिल कराव्यात असे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण विभागाला सूचना आल्या असून आदेशाची नवीन नियमावली सहित कलर कोडेड झोनिंग नकाशा ची त्वरित अंमलबजावणी केली जाणार आहे.

कराड व मलकापूर शहरासह आसपासच्या बांधकाम व्यावसायिकांना व नागरिकांना सुद्धा हा अत्यंत महत्वाचा विषय असून त्याचे निराकारण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने झाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा दिल्ली येथील २२ वर्षांचा अनुभव तसेच केंद्रीय मंत्री पदाचा अनुभव मुळे केंद्रातील मंत्र्यांशी व अधिकाऱ्यांशी सुकर चर्चा करून मार्ग काढण्यात यश आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाकडून महाराष्ट्रात सर्वत्र विमानतळाच्या परीघामधील 20 किलोमीटर आसपासच्या बांधकामावर बंदी घातली गेली होती. तो नियम कराड विमानतळाला सुद्धा लागू झाल्याने त्या अटींमध्ये शिथिलता व सुस्पष्टता यावी यासाठी कराडच्या बांधकाम व्यावसायिकांनी व क्रिडाईच्या प्रतिनिधींनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन देत चर्चा केली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिकांचा विषय पूर्ण समजून घेऊन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून व त्यानंतर प्रत्यक्ष मुंबईमध्ये चर्चा केली. तसेच केंद्रीय पातळीवर सुद्धा प्रयत्न करीत मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासमवेत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व या विभागाचे सचिव संजीव कुमार यांच्याशी चर्चा करून कराड शहराच्या विमानतळाबाबत योग्य ती माहिती देत वस्तुस्तिथी मांडली व जाचक अटी शिथिल करण्याची मागणी केली. त्यानंतरही महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली त्याप्रमाणे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशा तयार करून मान्यतेसाठी केंद्रीय विभागाला पाठविला होता. तोच नकाशा तात्काळ प्रसिद्ध व्हावा यासाठी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बांधकाम व्यावसायिक यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री व सचिवांची भेट घेऊन चर्चा केली.

गेल्या चार महिन्यापासून विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे कराड परिसरातील बांधकाम ठप्प आहेत, त्यांना लवकरात लवकर गती मिळण्यासाठी व शहराच्या विकासासाठी विमानतळ प्राधिकरणाने कलर कोडेड झोनिंग नकाशा प्रसिद्ध करावा अशी मागणी यावेळी चर्चेदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानुसार तात्काळ या मागणीचा विचार केंद्रीय मंत्र्यांनी कलर कोडेड झोनिंग नकाशाला परवानगी देत, अटींमध्ये सुस्पष्टता व शिथिलता आणून नवीन नियमावली जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला दिले असून त्याची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून झाली आहे, यामुळे बांधकाम व्यावसायिक व नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.