पनवेलच्या वाघेज पावभाजी सेंटरमध्ये चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

रायगड : हॅलो महाराष्ट्र – पनवेल शहरात सध्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चोऱ्यांच्या घटनांमुळे दुकानदार आणि सर्वसामान्य लोक त्रस्त झाले आहेत. आता तर चक्क पावभाजी सेंटरमध्ये चोरी झाल्याची समोर आली आहे. पनवेल शहरातील वाघेज पावभाजी सेंटरमध्ये अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये घुसून रोख रक्कमेसह इतर ऐवज चोरुन नेला आहे. वाघेज पावभाजी सेंटर हे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून तिथल्या गल्ल्यावर डल्ला मारला आहे. हि चोरीची घटना वाघेज पावभाजी सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर
वाघेज पावभाजी सेंटरमध्ये झालेल्या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांना चोरट्यांचा शोध घेणे सोपे जाणार आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या चोरांचा शोध सुरू केला आहे. दुकानांमध्ये सीसीटीव्ही असूनसुद्धा चोरांची चोरी करण्याची हिंमत पाहून पोलिससुद्धा हैराण झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्या थांबवण्याचे आणि या चोरांना पकडण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे.

चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
या परिसरात छोट्या धंद्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण दुकान बंद झाले तरी पैसे गल्ल्यातच ठेवतात. चोरांनी हेच हेरून ही चोरी केली आहे. गेल्या काही दिवसात वाढलेल्या चोरीच्या घटना पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. तसेच या चोरीच्या घटनांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आता पोलीस या चोरांवर कशाप्रकारे अंकुश घालतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.