हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हिवाळा सुरु झाला कि वातावरणात थंडी पडायला सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. ज्या लोंकाना दमा किंवा खोकला यासारख्या आजारांना सामोरे जावे लागत असेल तर त्यांनी हिवाळ्याच्या दिवसात खूप काळजी घेतली पाहिजे. दमादम्याचा त्रास असणाऱ्यांना हिवाळा अत्यंत तापदायक ठरू शकतो. लहान मुलांना थंडीचे दिवस सोसले जात नाहीत. त्यांनाच नव्हे तर मोठ्या लोकांना हि कफ, डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवायला सुरुवात होते.
हिवाळ्याच्या दिवसात थंडी असल्याने सर्दी छातीत कफ साचण्याची शक्यता जास्त असल्याने दम्याचा त्रास वाढू शकतो. म्हणून दही, ताक, दूध, मिठाई दम्याच्या त्रासाला आमंत्रण ठरू शकतात त्यामुळे अशा पदार्थांचं सेवन टाळावं. थंड कोणताही पदार्थ खाणे हिवाळ्याच्या दिवसात टाळले पाहिजे. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी, आईसक्रीम, कोल्ड टी तसेच कोल्ड कॉफी तसेच विविध शितपेयं कटाक्षाने टाळावीत. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी पाणी सहसा कोमठ करून प्यावं. सुंठ आणि मध किंवा आल्याचा रस आणि मध हे मिश्रण दम्याच्या रुग्णांसाठी हिवाळ्यात आरोग्यदायी ठरतं.
रात्री झोपताना तसेच सकाळी अंघोळीपूर्वी छातीला तीळतेल, महानारायण तेल लावून दररोज शेक घ्यावा त्यामुळे छातीत साचलेला कफ मोकळा होण्यास मदत होते. आयुर्वेदातील वमन हा उपक्रम दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतो. तसेच दम्याचा त्रास असणाऱ्यांनी २ ते ३ कप पाणी घेऊन त्यात तुळस, अडुळशाची प्रत्येकी दोन पाने टाकावी आणि एक कप काढा राहील अशा रितीने उकळून कोमठ काढा रात्री झोपताना किंवा सकाळी घ्यावा. त्याचप्रमाणे पाण्याची वाफ घ्यावी. दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम, कपालभारतीसारखे श्वसनसंस्थेशी संबंधित व्यायाम करावेत. आयुर्वेदिक उपायही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’